"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

                                22. *❃ अस्‍सल नकलाकार ❃* 
                                     
     एका गावात एका नकलाकाराचे दररोज कुठे ना कुठे कार्यक्रम होत असत. त्‍याचे उंची कपडे, गोड व खुसखुशीत बोलणे व त्‍याने केलेल्‍या विविध नकलांमुळे तो प्रसिद्ध होता. त्‍याच्‍या या आवाज काढण्‍याच्‍या कलेमुळे तो लोकांचा आवडता बनला होता. एका कार्यक्रमामध्‍ये त्‍याने एकदा मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला.  लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
लोक वाहवा करू लागले त्‍याच वेळी एक घोंगडी घेतलेला एक खेडूत शेतकरी उठून उभा राहिला व
म्‍हणाला,'' या कलाकाराने काढलेल्‍या आवाजापेक्षा मांजराच्‍या पिलाचा आवाज हा वेगळा असतो. या कलाकारासारखा आवाज मांजर कधीच काढत नाही. मी अस्‍सल मांजराच्‍या पिलाचा आवाज काढू शकतो.'' लोक म्‍हणाले,''ठीक आहे, तू आवाज काढून दाखव.'' असे म्‍हणताच घोंगडीवाल्‍याने आपल्‍या डोक्‍यावरून पूर्ण घोंगडी
पांघरली व आतून मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला. आवाज ऐकून लोक ओरडू लागले,''छे, छे, नाही, नाही, नकलाकाराने काढलेला आवाजच योग्‍य होता. तुला आवाज काढताच येत नाही.
तू चुकीचा आवाज काढतो आहे.'' हे ऐकताच घोंगडीवाला म्‍हणाला,'' मित्रांनो मी तो आवाज मुळी काढलेलाच नाही.'' असे म्‍हणून त्‍याने घोंगडी अंगावरून काढून फेकली व लोक आश्‍चर्यचकित झाले कारण त्‍याने एका हातात मांजरीचे पिलू धरले होते.
     तो पुढे म्‍हणाला,''मला माहित होते की तुम्‍ही लोक मी काढलेल्‍या आवाजाला नकार देणार म्‍हणून मी आवाज न
काढता या मांजरीच्‍या पिलाला दोन चिमटे काढले व त्‍या पिलाने आवाज काढला. तुम्‍ही मला का नाकारले याचे कारण मी या नकलाकारासारखा सजूनढजून न येता, खुसखुशीत न बोलता, बडेजाव न मिरवता साध्‍या वेशात माझे सादरीकरण केले.''
लोकांना आता शेतक-याचे बोलणे लक्षात आले.

                          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  चुकीच्‍या गोष्‍टीही अत्‍यंत आकर्षकपणे मांडल्‍या की सहजपणे प्रसिद्ध होतात यातून लोकांची दिशाभुल होते. समाजानेही भपक्‍यापेक्षा सत्‍याची कास धरणे गरजेचे आहे

No comments:

Post a Comment